पाणी योजना राबविण्यात आली. त्यावेळी ही योजना आखून शासनाचा पाठपुरावा करणार्या प्रमुख मंडळीत डोंबिवली ग्रामपंचायतीचे सदस्य व पुढे सरपंच म्हणून असलेले श्री. दिगंबर नारायण पाटकर होते याचा उल्लेख करावा लागेल. ग्रामपंचायतीमध्ये कै. लक्ष्मण वामन तिरोडकर व श्री. राजाराम रघुनाथ सामंत (इंजिनिअर)हे सुद्धा जागृत कार्यतत्पर सदस्य होते. वरील गणपतराव सामंत बंधूंनी पुढे मोठ्या धोरणाने शेट श्री. लालचंद हिराचंद यांच्याशी संधान बांधून प्रीमियर ऑटोमोबाईल्स ही कंपनी सहाशे एकर जमिनीत मानपाडा डोंबिवली येथे १९६२ साली आणली. ही कंपनी मानपाडा डोंबिवली येथे आल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे लक्ष ओद्योगिक वसाहतीच्या रुपाने इकडे वळले. ओद्योगिक वसाहत होण्यापूर्वीच सामंत बंधूंनी अनेक कारखान्यांना जमिनी देऊन येथे कारखाने आणले. स्टार टेक्सटाइल्स, फामाटेक्स, रोटेक्स, इ. कंपन्या त्यापैकीच आहेत.
१९५६ व ५७ साली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिकेत झाले. १९५८ ते १९८१ या नगरपालिकेच्या कालखंडात ५ कुडाळदेशकरांनी नगरपालिकेच्या पटावर आपली नावे झळकावली. सर्वप्रथम श्री. कमलाकर आत्माराम देसाई नगरपालिकेत निवडून गेले. आमच्या समाजात मुक्तपणे मांसाहार असल्याने अन्य ब्राह्मण समाज आपल्या ज्ञाती समाजाला ब्राह्मण मानीत नाहीत. या ब्राह्मणांच्या त्यावेळच्या गटबाजीत हे आमचे एकमेव ज्ञातीबांधव त्यांना पुरुन उरले आणि एवढेच नाही तर एक वेळ उपनगराध्यक्ष व दोन वेळा नगराध्यक्ष झाले. सध्याचे पूर्व विभागातील नगरपालिका कार्यालय, विष्णूनगरमधील हॉस्पिटलची जागा आणि पूर्व भागातील स्मशानभूमी ही त्यांच्या कारकिर्दीत झाली. या सर्व सरकारी जमिनी, या जमिनींवर इतरांचा डोळा असताना शासनाचा पाठपुरावा ठोसपणे करुन लोकहितासाठी त्या मिळविल्या. दोन बाबतीत तर नगराध्यक्षाच्या अधिकारात जनहितासाठी सरकारी जमिनीवर नगरपालिका कार्यालय व स्मशानशभूमीचे बांधकाम केले. त्यांची लोकप्रियता एवढी होती की, १९६८ साली ते नगरपालिकेत बिनविरोध म्हणून निवडून गेले. महाराष्ट्र शासनाने त्यांना १९८२ साली विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून गौरविले. प्रदीर्घ अशी १६ वर्षांची कारकीर्द त्यांनी नगरपालिकेत गाजविली. त्यांच्या बरोबरीने कै. महादेव दत्तात्रय ठाकूर (नानासाहेब) व श्री. जगन्नाथ घन:शाम उर्फ बाबा प्रभूखानोलकर हे वकीलव्दय नगरपालिकेत निवडून गेले. कै. नानासाहेब ठाकूर हे विरोधी पक्षनेते होते. त्यांचा जबरदस्त दरारा होता. निसर्गदत्त दणदणीत आवाज व अभ्यासपूर्वक विषयांची केलेली मांडणी व विवेचन नगरपालिकेच्या सभागृहात कधीही डावलले गेले नाही. त्यांनी नगरसेवक या नात्यांने केलेल्या कामाचा गौरव म्हणून नगरपालिकेने पूर्वीच्या आयरे रस्त्याचे नामकरण कै. म. द. ठाकूर मार्ग असे केले आहे. श्री. बाबासाहेब खानोलकर साधी राहणी व स्वभाव मृदू पण विषयांची मांडणी करताना आग्रही, क्वचित प्रसंगी आक्रमक असे त्यांचे स्वरुप होते. नगरपालिकेतील त्यांचे भाषण नेहमीच अभ्यास प्रचुर असे. कायदाविषयक समितीचे ते अध्यक्ष होते. ह्या तिघांची कारकिर्द स्वत: श्री.विजय कोचरेकर यांनी नगरपालिकेच्या सभागृहात फार जवळून पाहिली. श्री. नानासाहेब देसाई व श्री. बाबासाहेब खानोलकर एका गटात व विरुद्ध गटात कै. नानासाहेब ठाकूर अशी जुंपत असे. पण गंमत अशी की; सभागृहाच्या बाहेर त्यांच्यात कटूतेचा लवलेशही नव्हता. उलट एकमेकांबद्दल आदर व सौहार्द असे नाते होते आणि हे नाते म्हणजे ज्ञातीबंधाचा नाजूक धागा. १९७४ साली श्री.विजय कोचरेकर व कै. उषा पुरुषोत्तम ठाकूर यांनी नगरपालिका निवडणूका जिंकल्या. १९७४ ते १९८१ या कालखंडात श्री. विजय कोचरेकर सभागृहात विरोधी पक्षनेता म्हणून बसत असत. कै. उषा ठाकूर या सत्तारुढ जनसंघात होत्या. या दोषांची कारकिर्द दोघांनी आपल्या परीने यशस्वी