इ.स.२०१२ मध्ये नवीन कार्यकारिणी आली व श्री. गणेश गुरूदास देसाई हे कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोगचे कार्याध्यक्ष झाले. श्री. गणेश देसाई हे त्यांचे वडील कै. बाबल देसाई यांच्या प्रमाणेच धडाडीचे व कर्तृत्ववान कार्यकर्ते आहेत. त्यांना लोकसंग्रहाचा व्यासंग असल्याने त्यांनी अनेक अनुभवी, ज्येष्ठ ज्ञातीबांधवांचे सहकार्य घेऊन सहयोगाची बिघडलेली आर्थिक स्थिती कौशल्याने सुधारली, इमारतीचे नुतनीकरण करून विविध उपक्रमांची सुरूवात केली. इमारतीच्या कायदेशीर बाबींत लक्ष घातला. २७ जुलै २०१४ रोजी कुडाळदेशकर ज्ञाती संस्थांचे परस्पर सामंजस्य चर्चासत्र त्यांनी श्री. न. ना. पंतवालावलकर यांच्या नेवृत्वाखाली कुडाळदेशकर भवन, डोंबिवली येथे पार पाडले. सर्व ज्ञातीसंस्थांमध्ये ते आदरणीय आहेत. अशा प्रकारे यशस्वी वाटचाल करणा-या सहयोगाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष चालू आहे. (२६ जानेवारी १९६७-२०१७). त्या निमित्ताने आपल्या संस्थेचे संकेत स्थळ (वेबसाईट) सुरु झाले असून वरील इतिहास आपल्यासमोर मांडताना आम्हाला आनंद होत आहे.
निरनिराळा क्षेत्रात आमच्या ज्ञातीबांधगवांनी खास करुन आपल्या कर्तृत्वाने आपली कामगिरी नोंदविली आहे, असे गौरवाने म्हणावे लागेल. शिक्षण क्षेत्रात श्री. अविनाश रघुनाथ सामंत, श्री. बाबाजी राजाराम सरनाईक, सौ . विजया देसाई (आजगांवकर) हे स. वा. जोशी विद्यालयात अकरावी शालांत परिक्षेत सर्वप्रथम आले. श्री.अविनाश सामंत हे तर ठाणे जिल्ह्यात प्रथम व बोर्डात सतरावे आले होते. कु. महेश गुरुदास देसाई स. का. पाटील विद्यालयात दहावी शालांत परिक्षेत प्रथम येऊन बोर्डात १२ वा आला होता. १९६८ साली आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश न मिळाल्याने अपमानित झालेल्या श्री. दिगंबर आत्माराम सामंत यांनी जिद्दीने स.का.पाटील इंग्लिश मिडीअम स्कूल काढले व पुढे ज्यूनिअर कॉलेज ही त्याला जोडून सुरु केले. वैशिष्ट्य म्हणजे याच शाळेमधून दहावी शालांत परिक्षेत कु. महेश देसाई हा बोर्डात प्रथम आला. आमच्या ज्ञातीनांधवांची डोंबिवलीतील ही पहिली शाळा म्हणून गणना करावी लागेल. श्री. दत्तात्रय नेरुरकर आणि बंधुंनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ कै. रा. वि. नेरुरकर हायस्कुल व पांडुरंग विद्यालय मराठी माध्यमात सन १९७८ ला सुरु केले. डोंबिवलीचे भूषण राष्ट्रपती पदक विजेते कै. विठ्ठल सखाराम गवाणकर हे आदर्श शिक्षक या शाळेचे मुख्याध्यापक होते. १९८४ साली सौ. दर्शना दिवाकर सामंत यांनी ओंकार इंग्लिश मिडीयम स्कूल काढले. ही शाळासुद्धा प्रगतीपथावर आहे. कै. नारायणराव पाटकर यांच्या कुटुंबियांनी इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने कै. चंद्रकांत नारायण पाटकर यांच्या स्मरणार्थ पाटकर विद्यालय इंग्रजी व मराठी माध्यमात सुरु केले आहे. सौ. ज्योती पाटकर या नेत्रदीप बालमंदिराच्या व सौ. सुवर्णा कोचरेकर या कृष्णानंद मॉन्टेसरीच्या संचालिका आहेत. श्री. शशिकांत सामंत ह्यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक क्लासेस ही लोकप्रिय आहेत.
वैदयकीय क्षेत्रातही आमचे ज्ञातीबांधव कुठेही कमी नाहीत. कै. डॉ. अनंत नारायण पाटकर हे आमच्या डोंबिवलीमधील ज्ञातीबांधवातील पहिले डॉक्टर. त्यांनी आपले वडील कै. नारावणराव पाटकर यांच्या स्मरणार्थ मोफत दवाखाना चालवून अखेरपर्यंत लोकसेवा केली. डॉ. सुरेश भास्कर आजगांवकर हे डोंबिवलीतील पहिले दंतवैद्य. अत्यंत मृदू व धार्मिक स्वभाव, वाजवी फी घेऊन गेली ५०व र्षे आपला दवाखाना चालवित आहेत. एक यशस्वी व लोकप्रिय डॉक्टर म्हणून त्यांचा लौकीक आहे. डॉ. विजय दिगंबर पाटकर व त्यांच्या पत्नी डॉ. सौ. वैशाली हे दोघेही दंतवैद्य म्हणून प्रॅक्टीस करत होते. डॉ. दिलीप महादेव ठाकूर यांचा उल्लेख खास म्हणून करावा लागेल. आमचा डोंबिवलीतील पहिला ज्ञातीबांधव की, ज्याने पहिले सर्जिकल हॉस्पिटल काढले. विश्वासपूर्वक